जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर
एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्याचे आव्हान चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी स्वीकारले आहे. जगभरातील गिर्यारोहकांना ज्याची भुरळ पडते, काठिण्याचा सामना करत देशोदेशीचे दिग्गज ज्या स्वप्नाचा पुन्हापुन्हा पाठपुरावा करतात, त्या एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. आदिवासी विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव आहे ‘मिशन शौर्य’!
व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा घटक आहे आणि साहसी खेळातून तो वाढविण्यास मदत होते, या दृष्टिकोनातून आदिवासी आश्रमशाळांमधील शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या कणखर अशा १७ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोहिमेसाठी पाठविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.