ओडिशा, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातात शेकडो जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नेमकी चूक कुणाची यावरून अनेक सवाल करण्यात आले होते. आता या अपघातासंबंधित एका अहवालात नवीन धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बालासोरचा भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता, असं रेल्वे बोर्डाकडून अपघाताबाबत अहवाल दिलेल्या अहवालात समोर आलं आहे. अपघाताच्या तपासासाठी स्थापन केलेल्या समितीने अपघातासंदर्भात अहवालात अनेक बाबी उघड केल्या आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ट्रेन अपघातासंदर्भात तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने रेल्वे बोर्डाकडे दिलेल्या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार, ‘या अपघाताचं मुख्य कारण चुकीचा सिग्नल होता.’ समितीने म्हटलं आहे की, सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) विभागाकडून अनेक पातळीवर चुका झाल्या होत्या. आधीच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती, असंही उच्चस्तरीय समितीने म्हटलं आहे.