नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या युवतीचा मृतदेह तीन दिवस पाण्यात राहिल्याने केस शरीरापासून वेगळे होऊ शकतात अशी शक्यता दाट असते असे मत वैद्यकिय तज्ञांनी आपल्या अहवालात दिले आहे. त्यामुळे नीलिमा चव्हाण मृत्यु प्रकरणात कोणताही घातपात झाला नाही असा निष्कर्ष प्रथमदर्शनी समोर येत आहे अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट दाभोळच्या खाडीत नीलिमा चव्हाण मृत अवस्थेत आढळल्या. नीलिमा हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये नीलिमाच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा दिसून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालामध्ये, डॉक्टरांनी Viscera तपासणी करिता राखीव ठेवला असून लवकरच तपासणी रीपोर्ट प्राप्त होताच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत नीलिमा चव्हाणसोबत हॉस्टेलमध्ये राहणार्या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असणारे तिचे वरिष्ठ व सहकारी, बँकेतील नोकरवर्ग, पूर्वी नोकरीच्या ठिकाणी असणारे व्यक्ती, प्रवासा दरम्यान भेटणारे एसटी कंडक्टर, शेवटी पाहणारे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे स्थानिक मच्छीमार असे विविध १०४ साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या चौकशीत तसेच भरणे नका, खेड येथील सीसीटीव्ही फुटेज व जगबुडी नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी वावर असलेल्या महत्वाच्या स्थानिक साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या प्राथमिक पोलीस तपासात घातपाताचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही.