जळगाव जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर दारू ओतून पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी पती राजू किशोर तडवी याला अटक केली आहे.
राजू तडवी याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिच्या अंगावर दारू ओतून पेटती काडी फेकल्याने महिलेच्या कपड्यांनी पेट घेतला. आरडाओरड ऐकून नागरिकांनी धाव घेत आग विझवली आणि महिलेला उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर भाजलेल्या महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी राजू किशोर तडवी याला अटक केली. दरम्यानया प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वादातून हिंसाचाराचे वाढते प्रकार चिंतेचा विषय बनले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.