जालना शहरातील लक्कडकोट परिसरात कौटुंबिक वादातून महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आलेली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पतीने रागात येत पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृ्त्यू झाला. घटनेची माहिती पोलीसांना मिळतात तातडीने लक्कडकोट परिसरात धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. मात्र,हाच वाद वाढल्यानंतर पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, असा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेमागील नेमके कारण काय होते, वाद कशामुळे झाला तसेच ही हत्या पूर्वनियोजित होती का, याचा तपास पोलिसांकडून सध्या केला जात आहे. या घटनेमुळे लक्कडकोट परिसरासह संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली आहे.