जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
विदर्भात गेल्या 8 महिन्यात तब्बल 15 वाघांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आल्यानं वन्यप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. एकीकड़े वाघाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोटयावधींचा खर्च केला जातोय, अमिताभ बच्चन यांना ब्रँड एंबेसेडर बनवून जनजागृती केली जाते तर दुसरीकडे मात्र वाघांच्या मृत्युंचा आकडा वाढताना दिसतोय.
चंद्रपूरातील ताडोबा अभयारण्यातून आलेल्या वाघांचा शिरकाव मानवी वस्तीत होऊ लागल्यानं लोकांमध्ये दहशत पसरली. लोकांना बाहेर पडणं, शेतावर जाणं जिकरीचं होऊ लागलं. त्यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी शेताच्या कुंपणावर हाय होल्टेज असलेल्या विजेच्या तारांचं जाळं पसरवलं आणि त्यात एका वाघाचा होरपळून मृत्यु झाला. त्यावर प्राणी मित्रांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा ईशाराही दिलाय.
काही दिवसांपुर्वीच मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या एका नर वाघानं भंडारा जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत पसरवली होती. इथे एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दिवसाढवळ्या या वाघाचा मुक्तवावर सीतासावंगी आणि नाकाडोंगरी गावात पहायला मिळाला. या वाघाला गावातून हुसकावून लावण्यासाठी वनविभाग तसंच पोलीस प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वन संरक्षकांकडून देण्यात आलेत. या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागाची टीम देखील ठाण मांडून बसलीये. परंतु वनविभागाला अद्याप य़श आलेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत अद्याप कायम आहे.