बंडखोरी करणाऱ्या खासदारांना पुन्हा पक्षात परत आणण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंच्या गटाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित खासदारांशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, ज्या खासदारांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मराठवाड्यातील खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला असून, मंगळवारी रात्रीपर्यंत काही खासदारांचा त्यांच्याशी संपर्क झाला होता. मात्र त्यानंतरच्या दिवसात कोणताही ठोस संपर्क झाल्याचे दिसून आले नाही. दुसरीकडे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्याशी आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर वारंवार संपर्क साधत असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व नेते घेत असलेली माहिती थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.