जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपाशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडलीय. मोटारसायकलवरून निघालेल्या सावंत यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर समोरून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे मालाड-कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे. हा गोळीबार का व कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत.
कुरारच्या आपापाडा येथे राहणारे सचिन सावंत हे शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या सहकार्यासह मोटारसायकलवरून जात होते. कांदिवलीच्या गोकुळनगर परिसरातील साईबाबा मंदिरासमोर ते आले असता रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दोघा अज्ञात इसमांनी सावंत यांना भाऊ म्हणून आवाज देत थांबण्यास सांगितले.
सावंत हे भाऊ म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यामुळे सावंत यांच्या सहकार्याने मोटारसायकल थांबवली. मोटारसायकल थांबताच पाठीमागे बसलेल्या सावंत यांच्यावर अज्ञात इसमाने समोरून दोन गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सावंत यांना तात्काळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या सावंत यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मालाड-कांदिवली परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्यावर गोळीबार का व कोणी केला ते अद्याप समजू शकले नाही.