जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
फेक कॉलमुळे फसवणूकीच्या घटना सातत्याने घडत असतात. तुम्हांला लॉटरी लागली आहे, तुम्ही विजेते झाले आहात असे मनेक फेक कॉल आपल्याला येतात. अशाच प्रकारची घटना नाशिकमध्ये घडली आहे. व्हिआयपी नंबरसह आयफोन एक्स मोबाईल देण्याचे आमिष दाखवून माजी मंत्री आणि शिवसेना नेते बबनराव घोलप यांची अज्ञातांकडून फसवणूक करण्यात आली आहे. बबनराव घोलप यांची 1 लाख 33 हजारांची फसवणूक झाल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी घोलप यांना विविध नंबर्सवरुन फोन करुन नामांकित कंपनीचे नाव घेत तुम्हाला व्हिआयपी नंबरसह आयफोन देत असल्याचे सांगितले. तसेच, आपल्या बॅंक खात्यात 1 लाख 33 हजार 120 रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरले असतानाही संशयितांनी त्यांना व्हीआयपी मोबाईल नंबर व नवीन आयफोन मोबाईल न देता फसवणूक करून विश्वासघात केला. या प्रकरणी बबनराव घोलप यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.