एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. शनिवारी, ४ मार्च, २०२३ रोजी, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करत आंदोलन केले. या आंदोलनात औरंगजेबचे पोस्टर्स झळकवल्यामुळे अनेक शिवप्रेमींनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“इम्तियाज जलील हा देशद्रोही आहे” “इस राज्य में रहना होगा, तो संभाजी नगर कहना होगा”, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आंदोलनात औरंगजेबचे पोस्टर्स झळकावल्यामुळे त्यांनी इम्तियाज जलील यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
“ज्यांना छत्रपती संभाजीनगर मान्य नाही अशा औरंग्याच्या औलादींनी आपलं गाठोडं बांधावं आणि पाकिस्तानात चालतं व्हावं.” “लक्षात ठेवा मुघलांचं थडगं बांधण्याची ताकद हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ठेवतो.”, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिली आहे.
‘छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकलेत. शिवरायांच्या पावन भूमीत औरंग्याचं समर्थन कशासाठी? औरंग्याचं तुष्टीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा बीमोड करण्याची गरज आहे. उध्दवजी ठाकरे तुम्ही औरंग्याच्या तुष्टीकरणावर काही बोलणार की मूग गिळून गप्प बसणार?’, असे ट्विट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शुक्रवारी, २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या राज्याच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यात आले. या नामांतराविरोधात शनिवारी एमआयएमकडून आंदोलन करण्यात आले होते.