Shiv Thakare: राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता शिव ठाकरे चर्चेत आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून काही चालक संघटनांनी संपाचा इशारा दिल्यानंतर शिव ठाकरेने सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी अनोखी पुढाकार घेतली आहे. स्वतःची गाडी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देत त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी परवाना प्रक्रियेत मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले, तर काही अमराठी चालक संघटनांनी त्याला विरोध दर्शवला. या निषेधार्थ काही संघटनांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिव ठाकरेने नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरी शेअर करत, संपाच्या दिवशी त्याची गाडी कुठेही दिसल्यास हक्काने थांबवण्याचे आवाहन केले. त्याने गाडीचा नंबर आणि ओळखही पोस्टमध्ये दिली.
शिव ठाकरेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “रामराम महाराष्ट्र… ४ मे रोजी टॅक्सी चालकांचा संप आहे. तरी MH 27 DK 0909 ही Tata Harrier गाडी दिसली तर निर्धास्तपणे थांबवा. गाडीच्या मागे जय महाराष्ट्र लिहिलेलं असेल आणि ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा घातलेला दादा तुमच्या सेवेसाठी तयार असेल.”
यासोबतच त्याने “मराठी माणूस थांबता कामा नये” असा संदेशही दिला. त्याची ही भूमिका सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून, अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. काहींनी “सेलिब्रिटी असूनही लोकांसाठी पुढे येणं कौतुकास्पद आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिव ठाकरेची ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली. चाहत्यांसह अनेक नेटिझन्सनी त्याच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. काहींनी त्याला “खरा महाराष्ट्राचा माणूस” असेही म्हटले आहे.
टॅक्सी आणि रिक्षा संपामुळे मुंबईसह अनेक शहरांत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी शिव ठाकरेसारख्या व्यक्तींनी पुढाकार घेणे हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
संपाच्या वातावरणात सामान्यांच्या मदतीसाठी स्वतःची गाडी रस्त्यावर उतरवून शिव ठाकरेने वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे आता त्याची ही कृती केवळ चाहत्यांमध्येच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरली आहे.