राज्यसभा निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांसह काही अपक्ष आमदारांना नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते. मात्र प्रत्येक्षात निवडणुकीच्या मतदानावेळी काही आमदारांनी दगाफटका केल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत अशी वेळ येऊ नये म्हणून शिवसेना पूर्ण खबरदारी घेत आहे. २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना पवईतील रेन्सॉ हॉटेलमध्ये मुक्कामी येण्याचे आदेश दिले आहे. १८ जूनपर्यंत त्यांना हॉटेलमध्ये पोहचण्याचे आदेश दिले असून, याच दिवशी शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त घोडेबाजार टाळण्यासाठी महत्त्वाची रणनिती यात आखली जाईल. तसेच आमदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगितली जाणार आहे.
दरम्यान भाजपनेही विधान परिषद निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली असून १८ जूनपासूनच आमदारांना मुंबईत येण्याचे सांगितले आहे. तसेच अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांशी भाजपने संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील तीन दिवसांपासून आमदारांना भाजपकडून संपर्क साधला जात आहे. तसेच आपापल्या विभागानुसार आमदारांनी भाजप नेत्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही भाजपतर्फे देण्यात आल्या आहे.