मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा पठण या मुद्द्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर शिवसेनेने तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: खासदारांशी चर्चा करणार आहेत. वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन होणारं राजकारण, मनसे, राणा प्रकरण, विरोधकांकडून होणारे हल्ले या सर्वांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेवर आरोप करण्यात येत आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यासारख्या अनेक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आज शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.