पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना धनादेश न वटल्याप्रकरणी पालघर न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणी राजेंद्र गावित यांना न्यायालयाने एक वर्षाचा तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. तसेच शिवाय सदर दंड आणि शिक्षेला १८ मार्च पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
खासदार राजेंद्र गावित यांनी आपली जागा विकसित करण्यापोटी एका जमिनीच्या व्यवहारप्रकरणी चिराग कीर्ती बाफना यांच्याकडून एक कोटींची रक्कम घेतली होती. मात्र ८ ऑक्टोबर २०१४ रोजी एकच जमीन दोन लोकांना देण्याचे प्रकरण समोर आल्याने पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता.
या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.