सातारा : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ येथे मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मावळ, कामशेत आणि तळेगाव दाभाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार NH-48 वरील शिरवळ परिसरातून जात होती. आज पहाटे सव्वा एकच्या सुमारास हॉटेल शिवालयसमोर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरदार आदळली. धडकेनंतर कार पलटी झाली आणि विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन पोहोचली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.
चौघांचा दुर्दैवी मृत्यू
या अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलिंग धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि निखिल बाळू राऊत या चार युवकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी तीन जण कामशेत-मावळ परिसरातील, तर एक युवक तळेगाव दाभाडे येथील असल्याची माहिती आहे. अपघातात दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.