शिरूर तालुक्यात रविवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. शिरूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी पुण्याहून शिरूरकडे निघालेल्या आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने चार वर्षांच्या बालिकेला धडक दिल्याची घटना बोऱ्हाडे मळा परिसरात घडली. अचानक घडलेल्या या अपघातात बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडे मळा येथील पुणे–अहिल्यानगर महामार्गावर दुपारी रहदारी नेहमीप्रमाणे सुरू होती. याच दरम्यान शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे ही चार वर्षीय मुलगी रस्ता ओलांडत होती. येणाऱ्या वाहनांची कल्पना नसल्याने ती अचानक एका कारच्या आडून बाहेर पडली. या क्षणी आमदार कटके यांची काळ्या रंगाची मर्सिडीज कार त्या मार्गावरून वेगाने जात होती. चालकाने जोरदार ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र अंतर कमी असल्याने वाहन थेट बालिकेला धडकले.
हेही वाचा: Bomb Threat in Pune: पुण्यातील पंचतारांकित हॉटेलला बॉम्बची धमकी; पोलिसांची तत्काळ कारवाई
धडक एवढी जबरदस्त होती की बालिका काही फुटांवर उडत जाऊन रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली. अपघातानंतर आमदार कटके हे स्वतः कारमधून उतरले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसह मुलीला तत्काळ उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत तिला पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महामार्ग ओलांडताना मुलगी एकटी कशी आली? तिच्या पालकांची तेव्हा काय भूमिका होती? या प्रश्नांवर नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. परिसरात अनेक ठिकाणी पादचारी मार्ग, सिग्नल किंवा स्पीडब्रेकर नसल्याची तक्रार लोकांकडून व्यक्त करण्यात येत असून, या अपघातामुळे सुरक्षा व्यवस्थेकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे.
घटनास्थळावर काही वेळात पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. वाहनचालकाचा वेग, अपघाताची अचूक स्थिती आणि जबाबदारी याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आमदार कटके यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून, मुलीच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.