धाराशिव: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे. धाराशिव जिल्ह्यातील आळणी पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून 22 ते 23 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील नारगवाळी, बोरी आणि मातोळा गावांतील भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून आपल्या गावी परतत असताना धाराशिव रोडवरील टोलनाक्याजवळील आळणी पाटी परिसरात हा गंभीर अपघात घडला.
भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की पिकअपच्या पुढील केबिनसह मागील भागही तुटून वेगळा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले असून त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू असून 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.