शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरुन बंडखोर आमदारांवर जोरदार घणाघाती टीका केली आहे. ५६ वर्षांची शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचे अधिकार शिंदे गटाला कोणी दिले. सध्या शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून कॉमेडी एक्सप्रेस सीजन २ सुरु झाल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही शिंदे गटाचा यावेळी समाचार घेतला आहे. संसदेचे गटनेते विनायक राऊत, प्रतोद राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई आदी खासदार यावेळी उपस्थित होते.
शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणी घोषीत केल्यानंतर शिवसेना नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, शिंदे गटावर चांगलीच टिका केली आहे. जे काही वृत्त माध्यमातून दाखवण्यात आले, ते सध्या कॉमेडी एक्स्प्रेस २ कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण गुवाहाटीत पाहिला, आता पार्ट टू आला आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मात्र, जे शिवसेना सोडून गेले आहेत त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कम उभी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली. शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. काही आमदारांनी जाऊन गट स्थापन केला असेल, पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही. आमदार सांभाळण्यासाठी शिंदे गटाची धडपड सुरू आहे. शिवसेना हा मूळ पक्ष, त्यामुळे इतरांना अधिकार नाहीत, असं संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं.