मराठी अभिनेता शशांक केतकर हा त्याच्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो. अभिनयाबरोबरच तो त्याच्या समाजाप्रती असलेल्या जागरूकतेमुळेही प्रकाशझोतात असतो. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. अशातच त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. शशांकनं त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक नवा व्हिडीओ शेअर करुन मुंबईतले रस्ते, खड्डे आणि उघडी गटारं यावर भाष्य केलं आहे. शशांकनं व्हिडीओ शेअर करत मड आयलंड’ च्या रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवली आहे. तसेच, यावरुन सरकारवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत.
शशांक केतकरनं व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन लिहिलंय की, “Highway असो वा शहरातला, गावातला छोटा रस्ता… प्रवास करणारा जिवंत माणूस असतो. अनेक चालक नियम पाळत नाहीत मान्य आहे पण या अशा उघड्या गटारांचं काय करायचं? या गटारांमुळे अपघात झाला, जीव गेला तर जबाबदार कोण ? की मुंबईच स्पिरिट या नावाखाली हेही सहन करायचं आम्ही? शेवटी आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो. आपली लोकसंख्याच इतकी आहे की, या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर काय बिघडलं! बरोबर? यावर तातडीने ऍक्शन घेतली जाईल आणि संभाव्य अपघात टाळले जातील. माझा तुमच्यावर विश्वास आहे…”
हेही वाचा – MSRTC Job Vacancy : एसटी महामंडळात 17742 पदांसाठी मेगा भरती! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
याचबरोबर त्याने व्हिडीओच्या माध्यमातूनदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, “या देशातील रस्ते, रस्त्यांची एकंदर परिस्थिती हा फारच गमतीशीर विषय आहे. मला त्याबद्दल कायमच बोलायला आवडतं. कारण, हा देश माझा आहे. या देशातील रस्ते माझे आहेत आणि या रस्त्यांवरती माझ्या पैशाने विकत घेतलेली महागडी गाडी मी स्वत: चालवणार आहे…”.
“मडचा रस्ता हा आजचा विषय आहे. मड आयलंडला जाणारा जो रस्ता आहे, अनेक दशकं तो रस्ता झालेला नव्हता. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामध्ये गावकऱ्यांची वेगळी मागणी होती, शूटिंग करणाऱ्यांची वेगळी मागणी होती. इथे किती कायदेशीर आणि किती बेकायदेशीर काम चालतं, हा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला विकास करायचा असेल, इकडे एक वेगळी इंडस्ट्री उभी करायची असेल, गावकऱ्यांना एक सुखी आयुष्य द्यायचं असेल तर तुम्हाला विकास करावा लागणार आहे. ते करण्याकडे तुम्ही लक्ष द्या. जो अनेक दशके रस्ता झालेला नव्हता, त्याचं गेली एक-दोन वर्षे काम चालूच आहे. 50-60 टक्के रस्ता पूर्ण केलेला आहे…”, असं तो या व्हिडीओमध्ये म्हणाला.
नंतर तो म्हणाला की, “जो तयार झालेला रस्ता आहे. त्यामध्ये ड्रेनेजला लोखंडी झाकणं लावलेली आहेत. सायकल त्याच्यावरुन गेली तरी तुटतील. मागच्या एक दीड आठवड्यांपासून या ड्रेनेजची अवस्था अशीच आहे आणि महानगरपालिकेचं हे म्हणणं असेल की, आम्ही काम करणारच आहोत, म्हणून नारळाची झावळी खोचून ठेवली आहे. हे तुमचं काम आहे? जर गाड्यांचं चाक जर त्यामध्ये गेलं, तर त्या गाड्या अडकून पडणार आहेत. गाड्या डॅमेज होणार . तर महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आमचं जे काही डॅमेज होईल, ते भरण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एखादा बाईक चालवणारा तिथून गेला, तर त्याच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?”.