एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना आधार देणे गरजेचे आहे. परंतु चुकीच्या नेतृत्त्वाच्या पाठीशी नाही. तसेच राजकारणात संघर्ष असताना टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. एसटी कर्मचारी आणि माझा घनिष्ठ संबंध असून त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटले नसल्याचेही पवार म्हणाले.
संकटात सर्व एकजूटीने राहिले, त्याबद्दल शरद पवारांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच टोकाची भूमिका घेणारे आत्महत्यांना जबाबदार आहेत. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. नेता चांगला नसल्याने कर्मचारी भरकटले असल्याचे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पवारांच्या घराबाहेरी निदर्शने अस्थानी आणि अनाठायी आहेत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनाच्या मागे कुणाचे डोकं?, असा सवालही वळसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच महिलांना पुढे करून मॉब तयार करण्यात आला आहे, त्यामुळे पोलिसांना कारवाई करता आलेली नाही. यामुळे हे खरच आंदोलक होते का? याचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.