जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. कोरेगाव- भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनानिमित्त जानेवारीत ही मुलाखत होणार होती.
विशेष म्हणजे, याआधी देखील पवारांच्या कार्यव्यग्रतेमुळे 3 जानेवारी रोजी होणारी ही मुलाखत रद्द करून तिचे नियोजन 6 जानेवारी करण्यात आली. पण, अखेरीस ती पुन्हा रद्द झाली. त्यामुळे ही मुलाखत आता कधी होणार हे माहीत नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत. या मुलाखतीतून पवारांचे अनेक नवे पैलू उलगडले जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती.