जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
शेतकऱ्यांचा लॉंग मार्च कसारा घाट उतरून आज शहापूर तालुक्यात दाखल झाला आहे. शेतकरी बापाने आत्महत्या केलेल्या 25 मुलींनी या लॉंग मार्चचे अत्यंत हृदयद्रावक शब्दात स्वागत केले.
नाशिकपासून सुरु झालेला हा मोर्चा 12 तारखेला विधिमंडळावर धडकणार आहे. हजारो शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चात सहभागी झाले आहेत.
शेतकरी बापाच्या आत्महत्येचे दुःख लॉंग मार्च समोर मांडताना शेतकऱ्यांच्या या लेकी अत्यंत भावना विवश झाल्या होत्या. शेती परवडली नाही म्हणून हतबल होत बापानं आत्महत्या केली. तुम्ही उरलेल्या बापांना घामाचे दाम मिळावे म्हणून लढत आहात म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा शब्दात शेतकऱ्यांच्या या लेकींनी लॉंग मार्चला आपला पाठिंबा व्यक्त केला.
वडिलांच्या व्यथा मांडताना तिचा कंठ दाटून येत होता. लॉंग मार्च मध्ये सामील शेतकऱ्यांच्या पोरांच्याही काळजाला पीळ पडत होता. माय मावल्यांनी तर अश्रूंना वाट मोकळी एकूण देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आत्महत्या पर्याय नाही संघर्ष पर्याय असल्याचे या मुली काकुळतीला येऊन सांगत होत्या. शेतकऱ्यांच्या या लेकींना वडील गेल्या नंतर आधार तीर्थ आधार आश्रम नाशिक या संस्थेने आधार दिला. संस्थेचे त्रिंबक गायकवाड यांनीही यावेळी आपली उपस्थिती लावली.
सरकार पाठीशी उभे राहत नसल्यान शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसलं आहे.
