गिरीश रासकर, प्रतिनिधी
अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा फळाचे सेवन केल्याने त्रास होऊ लागल्याची घटना अहिल्यानगरमधून समोर आली आहे. अहिल्यानगरच्या शेवगावला राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील सात जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गेल्या रविवारी घडली. बाजारातून आणलेल्या आंब्याचा रस करून खाल्ल्याने ही घटना घडली असावी, अशी माहिती जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने बाजारात विविध जातींचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब जायभाय यांनी बाजारातून आंबे खरेदी केले. कुटुंबातील सर्वांनी आंब्याचा रस खाल्ला, त्यानंतर जायभाय कुटुंबातील सात जणांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी सर्वांना शेवगावमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून आली. काही केमिकल्स पोटात गेल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो, असे उपचार करणारे डॉ. सचिन पांडुळे यांनी सांगितले. दरम्यान, सात रुग्णापैकी सहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरू आहे. मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान विषबाधा झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने शेवगाव शहरातील फळ विक्रेत्यांची तपासणी केली.