दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीचा प्रेमविवाह झाला होता. यानंतरबीडमधील विवाहित महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. २७ वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी तिच्या माहेरी म्हणजे पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि आणखी एका व्यक्तीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढत ते भरुन ५० हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या संदर्भात एका २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि भाचा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. मासिक पाळीदरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले. या छळास कंटाळून ती माहेरी आली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत.
पुण्यातील विश्रांतवाडीत महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याची घटना समोर आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या आयुक्तांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींविरोधात शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी, अनैसर्गिक कृत्य आणि अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.