हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना जप्त करण्याचे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 23 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळं शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा साखर कारखाना जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे थकल्याने टोकाई सहकारी साखर कारखान्याला जप्तीचे निर्देश दिले आहेत. भाजप नेते शिवाजी जाधव हे टोकाई कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अनेक दिवसापासून ऊस उत्पादक शेतकरी त्याचबरोबर तोडणी आणि वाहतूक खर्च असे एकूण 23 कोटी रुपये टोकाई कारखान्याकडे थकीत आहे. ही थकीत रक्कम देणं शक्य नसल्याचं एक पत्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना लिहिलं होतं. त्या पत्राची गंभीरपणे दखल घेत साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना टोकाई सहकारी साखर कारखाना जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, कारखान्याच्या संपत्तीच्या लिलावासंदर्भात कार्यवाही केली जाईल अशी माहिती हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतू कारखान्याला ऊस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न यामुळं निर्माण झाला आहे. कारण जानेवारी महिन्यात कारखान्याला ऊस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळं शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत. शेतकरी अपार कष्ट करुन ऊस पिकवतात. मात्र हा ऊस कारखान्याला दिल्यावर त्यांनी त्याचा मोबदला वेळेवर दिला जात नाही.