राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली असून आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पाचवी किंवा आठवी मध्ये विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार. राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे या संदर्भातील कार्यपद्धती निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवले जाईल.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पहिले ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातोय. अर्थात त्यासाठी काही महत्त्वाची कारणं होती. नापास या संकल्पनेमुळे विद्यार्थ्याच्या मनात नकारात्मक विचार येतात. त्यामुळे ते खचतात. त्यांना आपल्या बुद्धिमतेला त्यातून हवी तशी चालना देता नाही. ते उलट त्याचाच विचार करतात. त्यामुळे ते नैराश्यात जातात. त्यामुळे कदाचित शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला होता. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्यापरिने विषय हाताळता येतील. त्यांचं शिक्षण होईल.
शिक्षण विभागाने आपल्या आधीच्या निर्णयात काहीसा बदल केलाय. शिक्षण विभागाने आता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा पास होणं विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केलं आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत समजा पहिल्यांदा यश मिळालं नाही तर पुन्हा त्यांना संधी देण्यात येईल. पण त्यातही त्यांना यश मिळालं नाही तर त्यांना त्याच वर्गात प्रवेश घ्यावा लागेल. त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.