जळगावातील शेदुर्णी येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास सरस्वती विद्या मंदिर या शाळेच्या बसचा रॉड तुटल्यामुळे बस पलटली असून पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे ३० विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.
शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेची ही बस आहे. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेकडे चालली होती. अपघात घडताच स्थानिक रहिवासी तात्काळ धावत आले. स्थानिकांनी बसमधील विद्यार्थी, शिक्षकांना बाहेर काढून खाजगी वाहनातून रुग्णालयात नेले. पहूर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पहूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.