मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव येत होते. अखेरी सात दिवसांनंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर आला अन् आपली भूमिका मांडली.
शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर 7 दिवसानंतर माध्यमांसमोर आले. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांच्या धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. शरद पवार यांचा दाभोळकर होईल, या पोस्टशी माझा काहीच संबंध नाही. मी त्याला ट्विट, शेअर किंवा लाईकसुद्धा केलं नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं. माझ्यावर आरोप केले. मी सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे.
मी जे ट्विट केलं होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याच तोंड वाकडं होऊन गेला, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते. त्यात यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हतं. त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझ्यासोबत माझा भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा होता. या प्रकरणाचा माझ्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची आणि पक्षाची माफी मागणार का? असा प्रश्न सुद्धा सौरभ पिंपळकर यांनी उपस्थित केला.