तेजस मोहतुरे, प्रतिनिधी,
नागपूर: सावनेरमध्ये एका महिला कबड्डीपटूने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणीतून सुटका व्हावी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि त्यानंतर लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे महिलेने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मृत महिला किरण सूरज दाढे (रहिवासी माळेगाव टाऊन, सावनेर) अशी ओळख पटली आहे. किरण आणि स्वप्निल जयदेव लांबघरे यांचे 2020 मध्ये नोंदणी पद्धतीने लग्न झाले होते. नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत हे लग्न पार पडले होते. मात्र लग्नानंतरही किरण माहेरीच राहत होत्या.
पती स्वप्निलकडून वेकोलीत नोकरी लावून देण्यासंदर्भात सतत टाळाटाळ होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय नातेसंबंध टिकवण्यासाठी दबाव, मानसिक त्रास, शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याच छळामुळे किरण यांनी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्वप्निलने दिलेल्या त्रासाचे अनेक पुरावे म्हणून तिने मोबाईलवरील सर्व मेसेजेस जतन करून ठेवले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, 4 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे साडे आठ वाजता किरण यांनी कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 7 डिसेंबर रोजी किरण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी स्वप्निल लांबघरे सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. घटना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.