जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारताचं संविधान… जे देतं प्रत्येक भारतीयाला माणसासारखं सन्मानानं जगण्याची हमी. त्यामुळेच जेव्हाही देशात संविधान बदलण्याची भाषा कानावर येते तेव्हा वातावरण ढवळून निघतं.
बाबासाहेबांना मानणारे आंबेडकरी अनुयायी तर पेटून उठतात. भाजपचे कर्नाटकातील नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी संविधान बदलाची भाषा बोलून दाखवली.
रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटले कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी संविधान बदलासाठीच सत्तेवर आल्याचं वादग्रस्त विधान केलंय.
संसदेत त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेससह विरोधकांनी तीव्र निषेध करत हेगडेंच्या राजिनाम्याची मागणी केली. तर, औरंगाबाद इथं रिपाई खरात गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयावर चढाई करत शाई फेकली. तर काही ठिकाणी अनंतकुमारांच्या छायाचित्रांचे तुकडे करत निषेध करण्यात आला.