शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत संपत्ती जप्त केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, मुंबईत येताच संजय राऊतांनी भाजपाला आव्हान दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा आमच्यावर हल्ले करत आहे. ते आम्हाला तुरुंगात पाठवतील. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. परंतु यापुढचे २५ वर्षे तुमचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर राज्यात खणली आहे. तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असला तर तुम्हीसुद्धा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही’, असे ते म्हणाले.
‘आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांनी टीका केली आहे. राष्ट्रभक्तीच्या नावावर किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. विरोधकांकडून मविआच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हल्ला केला जात आहे. आज राज्यात शिवसैनिक आक्रमक झाले. हा याविरुद्ध उसळलेला आगडोंब आहे. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे. यापुढे जशी त्यांची पावले पडतील, तशी आमचीही पावले पडतील, असे संजय राऊत म्हणाले.