जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
जिल्हा परिषदेकडून ४० रुपये किंमतीचे सॅनिटरी पॅड पुरविले जातात. मात्र बहुतांश कुटुंबांच्या आवाक्यात नसल्याने सॅनिटरी नॅपकीनचा वापर कमी करण्यात येतो. ग्रामीण भागातील महिलांना आणि जिल्हा परिषद शाळेतील मुलींना अस्मिता योजनेमार्फत ५ रुपयात सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच ८ मार्चचा मुहूर्त साधून ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या सात लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हा परिषदेच्या ११ ते १९ वयोगटातील मुलींना ५ रुपयाला पॅडचं एक पाकीट दिलं जाईल. या पाकिटात ८ पॅड दिले जातील. प्रत्येक मुलीची आपलं सरकार सेवा केंद्र मार्फत नोंदणी करण्यात येईल आणि एक स्मार्ट कार्ड देण्यात येइल.
अस्मिता योजनेतून महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध होईल. मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृती निर्माण होईल. ‘माझा गौरव, माझा हक्क’ असं अस्मिता योजनेचं ब्रिद वाक्य असून योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.