Sangli: सांगलीत ‘शोले’ स्टाइल प्रेमाचा ड्रामा; प्रेयसीसाठी टॉवरवर चढलेल्या प्रियकराचा अजब पवित्रा

टॉवरवर चढल्यानंतर तरुणाने ‘माझी प्रेयसी इथे आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Sangli: सांगलीत ‘शोले’ स्टाइल प्रेमाचा ड्रामा; प्रेयसीसाठी टॉवरवर चढलेल्या प्रियकराचा अजब पवित्रा

प्रेयसीने होकार द्यावा, यासाठी एका तरुणाने चक्क मोबाईल टॉवरवर चढून बसल्याची घटना सांगलीतील कुपवाड परिसरात घडली आहे. प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणाने घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडमधील स्वामी मळा परिसरात हा प्रकार घडला. संबंधित तरुण गेल्या सुमारे दोन तासांपासून मोबाईल टॉवरवर चढून बसला आहे. प्रेयसीने आपल्याला होकार द्यावा, अशी त्याची मागणी असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्याने थेट मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. टॉवरवर चढल्यानंतर तरुणाने ‘माझी प्रेयसी इथे आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून तरुणाशी संवाद साधत त्याला खाली उतरण्यासाठी समजावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी तैनात असून, तरुणाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रेयसीने घटनास्थळी यावे आणि त्यानंतरच आपण खाली उतरणार, अशी भूमिका तरुणाने घेतल्याने पोलिसांसमोर त्याला समजावून सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे आव्हान आहे. सध्या पोलिस आणि अग्निशमन दलाकडून तरुणाला खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number