Sangli Crime: अंधश्रद्धेचा कळस! ‘तू मागच्या जन्मी नागीण होतीस’ सांगत सांगलीत अल्पवयीन मुलीवर अघोरी अत्याचार; विट्यातील ‘कडेश्वर धाम’चा पर्दाफाश

सांगली जिल्ह्यातील विटा येथे भोंदूबाबांनी “मागच्या जन्मी नागीण होतीस” असा दावा करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Sangli Crime: अंधश्रद्धेचा कळस! ‘तू मागच्या जन्मी नागीण होतीस’ सांगत सांगलीत अल्पवयीन मुलीवर अघोरी अत्याचार; विट्यातील ‘कडेश्वर धाम’चा पर्दाफाश

सांगली जिल्ह्यातील विटा परिसरातून अंधश्रद्धेचा एक अत्यंत संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. "तू मागच्या जन्मी नागीण होतीस", असा अजब आणि अघोरी दावा करत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विट्यातील 'कडेश्वर धाम' नावाच्या आश्रमातील तीन भोंदूबाबांविरुद्ध पोलिसांनी पॉक्सो आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही काळापूर्वी गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाचीच पुनरावृत्ती या घटनेच्या निमित्ताने विट्यात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Gondia Crime: बदनामीच्या भीतीने कुटुंब गप्प बसलं, पण वासनांध अल्पवयीन मुलाने ओलांडल्या सर्व मर्यादा; गोंदिया हादरलं

'दैवी शक्ती'चा बनाव अन् साडेचार लाखांची लूट
विट्यातील पाटील वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून 'कडेश्वर धाम अध्यात्म संस्था' नावाचा एक आश्रम सुरू आहे. हा आश्रम महेश मोहन बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस) आणि सूरज उपाध्ये हे तिघे मिळून चालवत होते. आपल्याकडे अफाट दैवी शक्ती असल्याचा आव हे तिघे आणायचे. या शक्तीच्या बळावर लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा बनाव करून ते आश्रमात येणाऱ्या भक्तांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करत होते. पूजा आणि हवनाच्या नावाखाली त्यांनी पीडित कुटुंबाकडून तब्बल साडेचार लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.

'मागच्या जन्मी तू नागीण होतीस…' अघोरी दाव्याने अत्याचार
या भोंदूंनी अंधश्रद्धेचा बाजार मांडत एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले. "तू मागच्या जन्मी नागीण होतीस आणि हा (भोंदू) नाग होता. या जन्मात तुमच्या दोघांचे लग्न लावून देण्यासाठीच तुमचा पुनर्जन्म झाला आहे," असा अघोरी बनाव त्यांनी रचला. या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत नराधमांनी त्या अल्पवयीन बालिकेवर वारंवार अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी पीडितेला तोंड न उघडण्यास भाग पाडले होते.

हेही वाचा: Solapur Crime: अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह; संशयाने पछाडलेल्या ऋषिकेशने भररस्त्यात धनश्रीवर चाकूने केले तब्बल 50 वार अन्…

अखेर भोंदूंचा बुरखा फाटला, पोलिसांत गुन्हा दाखल
या सततच्या त्रासाला कंटाळून आणि भोंदूंचा खरा चेहरा समोर आल्यानंतर अखेर या अघोरी कृत्याविरोधात पोलिसांत धाव घेण्यात आली. विटा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्ये या तिघांवर भारतीय न्याय संहिता (BNS), बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायदा, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number