सध्या विकृतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे. सांगलीमध्ये पोटच्या लेकींचा नराधम बापाने अमानुष छळ केला आणि यामध्येच एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप चिमुकल्यांना उलटं टांगून रात्रभर अमानुष छळ करण्यात आला. या क्रूर अत्याचारात 10 वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दादू यमगर असं क्रूर पित्याचं नावं आहे.बुधवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास मुलींच्या वडिलांनीच दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने तडफडत पाणी पाणी बोलत होत्या. मात्र, निर्दयी आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही.
मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. अनुजा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे समाजमन हादरलं असून बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.