वाशिम: समृद्धी महामार्गावर होणाऱ्या आपघातांची मालिका काही केल्या थांबेना. यवतमाळ येथून शिर्डी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज गावाजवळ हा प्रकार घडला असून, भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या कारचा वेग सुटून जोरदार पिकअपवर धडकली. धडकेचा जोर इतका होता की कारचे मोठे नुकसान झाले आणि प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातात कारचालक मंगेश आणि यवतमाळ येथील 40 वर्षीय विक्रम अशोकराव सौरगपते यांचा जागीच मृत्यू झाला. धक्का बसताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र दोघांना वाचवण्याचा प्रयत्नही व्यर्थ ठरला. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा: E- Cigarette : भारतात ई-सिगरेट बंद तरीही संसदेत इतकी चर्चा का? जाणून घ्या
याच दुर्घटनेत अनुकूल मनोज यादव (वय 35, रा. दत्त चौक, यवतमाळ) आणि मयूर दीपक डोनाडकर (वय 29, रा. दत्त चौक, यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात तातडीने नेहण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मध्यरात्री झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. समृद्धी महामार्गावरील वाढत्या वाहनवेगावर नियंत्रणाची गरज असल्याची स्थानिकांची भावना पुन्हा एकदा पुढे आली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून मालवाहू वाहनचालकाची कसून चौकशी केली जात आहे.