मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गेल्या काही काळात झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वेगवान वाहतूक, लांब पल्ला आणि अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर स्वतंत्र ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटांतच उपचार मिळावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासोबतच नागपूर ते मुंबईदरम्यान असलेल्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या संदर्भात विधान परिषदेत उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. समृद्धी महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, 701 किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
महामार्गावरील मूलभूत सुविधा वाढवण्यावरही भर देण्यात येत आहे. सध्या समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी इंधन स्थानके, स्नॅक्स सेंटर आणि स्वच्छतागृहांसह सुविधा कार्यरत आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 21 ठिकाणी प्रत्येकी 20 अशा एकूण 420 एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांची देखभाल आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गावर सात ठिकाणी हॉटेलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी टप्प्याटप्प्याने महामार्ग सुविधा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षितता, आरोग्यसेवा आणि सोयीसुविधांचा समतोल राखत समृद्धी महामार्ग अधिक सुरक्षित आणि प्रवाशांसाठी अनुकूल करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे या निर्णयांवरून स्पष्ट होत आहे.