भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन अॅपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत चक्क साईबाबांचं नाव घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब ) ( क ) राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी मतदान प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांना जास्तीत जास्त भाग घेण्यासाठी 1 ऑक्टोबर 2017 पासून www.nvsp.in सुरु करण्यात आली. मात्र या वेबसाईटाचा काही लोक दुरुपयोग करताना आढळून आलं आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भारत आयोगाच्या या ऑनलाईन सेवेचं अॅपही सुरू करण्यात आलं.
मात्र या अॅपमध्ये अज्ञात व्यक्तीने नमुना नंबर 6 फॉर्मवर अर्ज भरला.
या अर्जात आपलं नाव ‘साई’ लिहिलं आहे.
वडिलांचं नाव ‘राम राम’ लिहिलं आहे.
आपला पत्ता ‘शिर्डी’ लिहिलं आहे , तर वय- 24, पुरुष असे लिहिले असून आपला फोटो लावण्याऐवजी श्री साईबाबांची प्रतिमा लावली आहे.
साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अर्ज छाननीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी त्याच वेळी राहाता पोलिसांना याबाबत कळविले होते.
हा गुन्हा सायबर क्राईम असल्याने पोलिसांनी नगरला तक्रार करण्यास सांगितले.
ही तक्रार सायबर सेलकडे गेली असता त्यांनीही तक्रार दाखल करण्यास असमर्थता दाखविली.
त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. अखेर मंगळवारी रात्री राहाता पोलिसांनी नायब तहसीलदार म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या अॅपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या आणि भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचे काम या अज्ञात व्यक्तीने केलं आहे. या अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब) (क) नुसार अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
करोडो भाविकांचे आराध्य दैवत आणि शिर्डीचे ग्राम दैवत असलेल्या साईबाबांच्या नावाची मजाक उडवणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ करत आहेत. साईबाबांचे नाव शिर्डी विधानसभा मतदार यादीत घालण्याचे काम करणाऱ्या या अज्ञात व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ करत आहेत.