जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सदाभाऊ कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच, त्यांना काळे झेंडे दाखवले. काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्या धास्तीने सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. आजही अशाच प्रकारे पंढरपूर दौऱ्यावेळी सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला.