एस-400 सुदर्शन चक्र : भारताच्या हवाई सुरक्षेचं अत्याधुनिक कवच

जम्मूतील रॉकेट हल्ला उधळून लावत एस-400 प्रणालीने भारताच्या हवाई सुरक्षेला नवे बळ दिलं.

एस-400 सुदर्शन चक्र : भारताच्या हवाई सुरक्षेचं अत्याधुनिक कवच

नवी दिल्ली: भारताच्या हवाई सुरक्षेसाठी 'एस-400 सुदर्शन चक्र' ही प्रणाली एक महत्त्वपूर्ण वळण ठरली आहे. रशियाकडून 2018 साली खरेदी करण्यात आलेली ही अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आता प्रत्यक्षात वापरात आली असून, जम्मूमधील अलीकडील रॉकेट हल्ल्यात याचा यशस्वी वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या क्षमतेमुळे मोठा अनर्थ टळला असून देशाच्या संरक्षण क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे.

एस-400 ही जगातील सर्वात प्रगत एअर डिफेन्स प्रणालींपैकी एक मानली जाते. ही प्रणाली एका वेळी अनेक हवाई धोक्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे, भारताने प्रथमच संरक्षणासाठी या यंत्रणेचा वापर केला असून यामुळे शत्रूला स्पष्ट संदेश मिळाला आहे. भारत आता अधिक सज्ज आणि धोकादायक झाला आहे.

हेही वाचा: जम्मू विमानतळावर पाकड्यांचा डाव उधळला; एस-400 च्या चपळतेमुळे टळली मोठी आपत्ती

एस-400 सुदर्शन चक्राची वैशिष्ट्यं

ही प्रणाली 600 किमी पर्यंतच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करू शकते. हे केवळ रेंजच नव्हे, तर वेगाचंही उदाहरण आहे – कारण एस-400 अवघ्या एका सेकंदात 4.3 किमी अंतर पार करते. यामुळे कोणताही शत्रू क्षेपणास्त्र वा फायटर जेट भारताच्या सीमेत शिरण्याआधीच नष्ट करता येतो.

एस-400 एकाचवेळी 72 क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता ठेवते. म्हणजेच शत्रूने एकाचवेळी अनेक हल्ले केले, तरीही ही प्रणाली त्यांचा प्रभावीपणे मुकाबला करू शकते. एवढंच नाही, तर ही प्रणाली शत्रू राष्ट्राच्या फायटर जेटलाही पाडू शकते आणि अणुबॉम्बसारख्या गंभीर हल्ल्यांनाही निष्फळ ठरवू शकते.

100 फूटांपासून ते थेट 40 हजार फूट उंचीपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ही एस-400 ची आणखी एक खासियत आहे. त्यामुळे जमिनीपासून आकाशात कुठल्याही उंचीवरचा धोका भारतीय रडारला चुकवू शकत नाही.

भारताची सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट

एस-400 चा वापर केवळ जम्मूतील घटनेपुरताच मर्यादित नाही. ही प्रणाली देशाच्या विविध संवेदनशील सीमांवर तैनात करण्यात आली आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांना कोणतीही आगळीक करण्याआधी अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.

ही प्रणाली भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला सुसंगत नसली, तरीही सुरक्षा क्षेत्रात भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्याचा उत्कृष्ट नमुना दाखवला आहे. भविष्यात या प्रणालीवर आधारित भारतीय बनावटीच्या प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

एस-400 सुदर्शन चक्र ही केवळ एक यंत्रणा नसून, भारताच्या हवाली झालेलं एक अचूक शस्त्र आहे. आधुनिक युद्धशास्त्रात अशा प्रणालींचं महत्त्व मोठं आहे आणि भारताने हे सामर्थ्य आपल्या हाती घेतल्यामुळे शत्रू राष्ट्रांची झोप उडणं स्वाभाविक आहे. भारतीय लष्कराची ताकद अधिकच वाढली असून, देशवासींनी दिलासा मानावा अशी ही ठोस पावले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number