मुंबई, १८ मे २०२३, प्रतिनिधी : अखेर बैलगाडा शर्यतीचा भवितव्य गुरुवारी (१८ मे) रोजी ठरणार आहे. बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत गुरुवारी सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडू तसेच महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा निकाल गुरुवारी एकत्रित लागणार आहे .
डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे बैलगाडा मालकांचे तसेच शर्यत प्रेमींच लक्ष लागलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २०११ साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर २० एप्रिल २०१२ रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते. यानंतर सातत्याने बैलगाडाप्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येत होती. हे प्रकरण शेवटी सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती.