पुणेकरांना महागाई आता प्रवासावाढाची देखील झळ बसणार आहे. आज पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली 'आरटीए'ची बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील वाहतुकीसंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात असून रिक्षाच्या भाडेवाढीबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान जितेंद्र डुडी यांनी सांगितलं की, (RTO) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भाडेवाढीचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आला नाही.
मात्र लवकरच हा निर्णय जाहीर करण्यात येईल. त्यामुळे येत्या दोन दिवसात रिक्षाचे नवीन भाडे दर जाहीर करणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षांचा मोठा वाटा आहे. असं असताना सीएनजीच्या किमतीत झालेली मोठी वाढ, वाहनांच्या सुट्या भागांचे वाढलेले दर, विमा, देखभाल आणि दुरुस्तीवरील वाढता खर्च या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर 'आरटीए'च्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात जुन्या दरानुसार, 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर हे दर 17 रुपये प्रती किलोमीटर असे वाढवण्यात आले. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'आरटीए'च्या बैठकीत नवीन दरानुसार भाडे आकारण्यात येणार आहेत. यावेळी गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही भाडेवाढ न झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून रिक्षाच्या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.