नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) विजयादशमी उत्सव यंदा विशेष ठरणार असून, संघाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधून गुरुवार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूरच्या रेशमबाग मैदानावर हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन करून उत्सवाची सुरुवात केली आणि वार्षिक संबोधन दिले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संघाच्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण होत असल्याने हा उत्सव अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे. 1925 मध्ये डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी 17 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत संघाची स्थापना केली होती. 1926 मध्ये "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हे नाव निश्चित करण्यात आले, तर याच वर्षी पहिल्या विजयादशमी उत्सवात पथसंचलनाची सुरुवात झाली होती.
या वर्षीच्या समारंभात 21 हजार स्वयंसेवक सहभागी झाले. योग, प्रात्यक्षिक, नियुद्ध, घोष आणि प्रदक्षिणा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभरातील 83 हजारांहून अधिक शाखांमध्येही विजयादशमीचे औचित्य साजरे करण्यात आले. संघाने शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरात एक लाखाहून अधिक हिंदू संमेलनांसह अनेक उपक्रम राबविण्याची घोषणा केली आहे.
कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांची उपस्थितीही विशेष ठरली. घाना, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, थायलंड, यूके आणि यूएसए यांसह विविध देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलित, डेक्कन समूहाचे के. व्ही. कार्तिक आणि बजाज समूहाचे संजीव बजाज यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. "ही पर्वणी सत्य आणि सद्गुणांच्या विजयाचे प्रतीक आहे. या प्रसंगी प्रत्येकाला साहस, बुद्धी आणि भक्तीच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळो," अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.