मुंबई: आयपीएल 2026 मधील 20व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगतदार सामना सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्मा याने एक मोठा विक्रम त्याच्या नावावर केला. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा पार केला आहे. आयपीएलच्या इतिहासात एका फ्रँचायझीकडून ही कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रोहित शर्मा याच्या नावावरच आहे. एका फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत अव्वल स्थानावर विराट कोहली आहे, त्याने आरसीबीकडून खेळताना तब्बल 8840 धावा केल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी याचे नाव असून त्याने चेन्नई सुपर किंग्स कडून 4865 धावा केल्या आहेत. त्यानंतर सुरेश रैना याने सीएसकेसाठी 4687 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे, रोहित शर्माने नुकताच मुंबई इंडियन्ससोबत 15 वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 240 धावांचा डोंगर उभारला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची शानदार भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. कोहली याने 38 चेंडूत 50 धावा केल्या, तर सॉल्टने 36 चेंडूत 78 धावांची तुफानी खेळी केली.
यानंतर रजत पाटीदार यानेही जबरदस्त फॉर्म दाखवत केवळ 20 चेंडूत 53 धावांची आक्रमक खेळी साकारली. शेवटच्या षटकांमध्ये टिम डेव्हिड याने 16 चेंडूत नाबाद 34 धावा करत संघाचा स्कोर अधिक भक्कम केला. जितेश शर्मा याने 10 धावांचे योगदान दिले, तर रोमारियो शेफर्ड दोन धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मिचेल सॅन्टनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.