आज 8 मार्च, संपुर्ण जगात आजचा दिवस जागतिक महिला दिन (Women's Day 2025) म्हणून साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सर्वत्र महिलांचं कौतूक केलं जातं. अशा यादिवशी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून एक खून माफ करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
रोहिणी खडसे यांनी एक पत्र त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. यातमध्ये त्यांनी महिलांना एक खून माफ करण्याची विनंती केली आहे. सर्वात प्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे, असे रोहिणी खडसे यांनी पत्राच्या सुरूवातीला म्हटलं आहे.
हेही वाचा – Women's day 2025: पुणे मेट्रोकडून महिलांसाठी खास गिफ्ट! वन डे पास फक्त २० रुपयात
रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना लिहलेलं पत्र
मा. द्रौपदी मूर्मू राष्ट्रपती
विषय : एक खून माफ करणेबाबत
महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…
आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?
नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.
आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू.
धन्यवाद!
रोहिणी खडसे
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्षा