अमोल दरेकर. प्रतिनिधी. पुणे: शुक्रवारी झालेल्या जोरदार मान्सून पावसाने वाघोली परिसरात अक्षरशः कहर केला. अवघ्या काही तासांतच रस्त्यांवर पाणी साचले. ज्यामुळे चौकांचे तलावात रूपांतर झाले, तर मुख्य रस्ते ओढे आणि नाल्यांसारखे वाहू लागले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
हेही वाचा: मुंबईतील कोस्टल रोड भुयारी मार्गात कार घसरली; चालकाला किरकोळ दुखापत
तसेच, वाहनचालकांना त्यांच्या वाहनांची कसरत करत पुढे जाणे मुश्किल झाले. यासोबतच अनेक वाहनेही पाण्यात बंद पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दरम्यान, उपनगरातील विविध भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. रस्त्यांच्या कडेला पाणी वाहून नेण्यासाठी गटार लाईनची व्यवस्था नसल्यामुळे साचलेले पाणी रस्त्यावर तुंबत आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. 'प्रशासनाने या समस्या गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना कराव्यात', अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.