जन्मदात्या वडिलांनी केली मुलीची गोळीबार करून हत्या; चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती

जळगाव चोपड्यात प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने मुलीची गोळीबार करून हत्या केली; जावई गंभीर जखमी, शहरात खळबळ.

जन्मदात्या वडिलांनी केली मुलीची गोळीबार करून हत्या; चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम विवाह केल्याचा राग डोक्यात धरून जन्मदात्या वडिलांनी आपल्या मुलीची गोळीबार करून निर्घृण हत्या केली. या भीषण घटनेमुळे संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.

शनिवारी रात्री चोपड्यातील आंबेडकर नगरमध्ये अविनाश वाघ यांच्या बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात ही घटना घडली. सीआरपीएफमधील सेवानिवृत्त अधिकारी किरण अर्जुन मंगले यांनी आपल्या मुली तृप्ती आणि जावई अविनाश यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश वाघ गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाशने प्रेम विवाह केला होता. मात्र हा विवाह वडिलांना मान्य नव्हता. त्यामुळे वडिलांच्या मनात सतत रागाचा धुमस होत होता. शनिवारी अविनाशच्या बहिणीच्या विवाह समारंभात तृप्ती आणि अविनाश सहभागी झाले होते. याची माहिती मिळताच किरण मंगले शिरपूरहून चोपड्यात आले आणि रात्री दहा वाजताच्या सुमारास लग्नसमारंभातच आपल्या परवानाधारक पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या.

हेही वाचा: यवतमाळमध्ये पाणीटंचाईसाठी जबाबदार अधिकाऱ्यांचे वेतन थांबणार; पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मंगले यांच्यावर हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

डॉ. रेड्डी यांच्या मते, किरण मंगले यांच्याकडे वैध परवाना असलेली पिस्तूल होती आणि त्यांनी गोळीबार केला. मात्र अन्य कोणाची मदत झाली का, याचा तपास सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. प्रतिष्ठा, अहंकार आणि चुकीच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी एका पित्याने आपल्या लेकीचा बळी घेतल्याने पुन्हा एकदा सैराटची झलक समाजाला पाहायला मिळाली. प्रेमविवाह करण्याऱ्या तरुण-तरुणींना अजूनही समाजाच्या कोडग्या मानसिकतेचा सामना करावा लागत आहे, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.आरोपी व गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number