मुंबईतील सिद्धार्थनगरमधील पत्राचाळ गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना संबोधित केले. तसेच आज शुभारंभ झाला आहे, उद्या घरेही मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
‘मुंबईत अनेक लोक पोटापाण्यासाठी येतात आणि राहतात. परंतु हक्काचे घर मिळाल्याने ते विकून सोडून जाऊ नका. तुम्ही आजवर केलेला संघर्ष कायम लक्षात ठेवा. हक्काचे घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या स्वप्नांची वाट पाहत होतो ते आज सुरू होत आहे. लवकरच तुम्हाला घरे मिळणार आहेत. अनेक लोक घराची वाट पाहून निघून गेले. तर घर मिळवण्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष लक्षात ठेवा. तुम्ही जिद्दीने संघर्ष केला आणि तो जिंकला, असे मुख्यमंत्री म्हणाले.