मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, पुणे आणि मुंबईत सतत पाऊस होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विदर्भासह कोकणातील अनेक नद्यांना पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यातच आता मुंबई, पुणे, रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच कोकण आणि विदर्भात येत्या २४ तासांत वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच सांगली, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. कोकणातील वशिष्ठी, पाताळगंगा आणि सावित्री नदीला पूर आला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. संगमेश्वर, खेड आणि चिपळूण शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे विदर्भातील वैनगंगा नदीला पूर आला असून गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे.
मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळं लोकल सेवा विस्कळीत होत आहे. रुळांवर पाणी साचत असल्याने अनेक रेल्वे नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळं सतत होत असलेल्या पावसाचा मुंबईकरांना मोठा फटका बसत आहे. याशिवाय गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह नागपूर शहरातील अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे.