चिपळूणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅंक कर्मचारी असलेला 33 वर्षीय तरूण पोलिसांना पत्र लिहून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव मुकुंद मुरलीधर पालांडे असे असून त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरात एका बँकेत कार्यरत असलेला 33 वर्षीय युवक काल दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे असे या युवकाचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात चार पानी पत्र लिहून शाखेतील चार जणांना आपल्या टोकाच्या निर्णयास जबाबदार धरले आहे.
मानसिक त्रास, ब्लॅकमेल आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. दरम्यान, कोळकेवाडी परिसरात त्यांची दुचाकी आढळून आली असून पोलिसांकडून बोटीद्वारे शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालांडे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सकाळपासून पुन्हा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिरगाव पोलिस निरीक्षक भरत पाटील यांच्या पथकाने शोधकार्य बोटीच्या सहाय्याने सुरू केलं आहे. मुकुंद पालांडे यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलं नसून चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात शोधमोहीम सुरू आहे.